वारी- काय आहे जाणून घ्या !
वारी सोहळा
हा माऊलींचा असला तरी माऊलीला ज्याची चिंता तो वारकरी ऊन, पाऊस, वारी याची तमा न बाळगता वारीत चालत राहतो.
कारण त्याला भेटायचे असते ते विठुरायाला आणि त्याला सोबत असते माऊली... काही
निष्ठावंत वारकरी तर दिवसभर तोंडात पाणीसुद्धा घालत नाहीत. काय खायचे-प्यायचे ते
रात्री तळावरच... निष्काम सेवेचा धडा मिळतो या वारीतच! पालखी सोहळ्यात सर्वांत
पुढे चालणारा श्री माऊलींचा अश्व हा श्री श्रीमंत शितोळे सरकार यांचे
अंकली-बेळगाववरून श्रीक्षेत्र आळंदीस परंपरेनुसार पायीच आणला जातो. विशेष हे की या
अश्वावर कोणीही मनुष्य स्वार झालेला नसतो. हा अश्व ज्येष्ठ शु॥११ ला अंकलीवरून
प्रस्थान करतो आणि जेष्ठ वद्य ७ ला (पूर्ण ११ दिवस) आळंदीत प्रवेश करतो. आळंदीला
इंद्रायणी नदीच्या पुलापाशी अश्व आले की श्रीमंतांचे प्रतिनिधी तसा निरोप मंदिरात
सोहळ्याचे मालक व चोपदार यांना देतात. त्यानंतर श्री हैबतबाबांची दिंडी अश्वांना
सामोरी जाते. अश्वांची पूजा केली जाते. त्यानंतर वाजतगाजत अश्वांना मंदिरात आणले
जाते. अश्वांच्या स्वागतासाठी मंदिरात पायघड्या घातलेल्या असतात. अश्वाला आळंदीसं
पायी आणण्याच्या मागे केवळ परंपराच नाही तर एक श्रदधाही जोडलेली आहे हा अश्व अंकली
(बेळगाव) वरून आळंदी येताना ज्या ज्या गावी जातो तेथील जनसमुदाय त्याचे दर्शन
घेतात; कारण त्याला केलेला नमस्कार श्री माऊलीच्याकडे आणि
त्यांच्या करवी श्री पंढरीच्या विठुरायाकडे पोहोचतो अशी दृढ श्रदधा असते. संपूर्ण
सोहळ्यात श्रींची सामूहिक चार स्नाने होतात. पंढरीस जाते वेळी व परतीचे वेळी
होणारे नीरा स्नान आणि श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढ एकादशी व आषाढ पौर्णिमेस
होणारे श्री चंद्रभागेचे स्नान. संपूर्ण वारीत सकाळच्या वेळीस फक्त दोनच ठिकाणी
आरती होतात प्रथम- थोरल्या पादुका (चर्होली) आणि दुसरी पुणे येथे शिंदे छत्रीपाशी.
श्रीमंत शिंदे सरकार यांनी श्री माऊलींच्या मंदिर व्यवस्थेसाठी आळंदी आणि नाणज ही
गावे इनाम दिली होती, श्री गुरु हैबतबाबादेखील शिंदे सरकार
यांचे पदरी सरदार होते. माऊलींच्या मदिरातील महाद्वार, नगारखाना,
वीणा मंडप हे श्री शिंदे सरकार यांनीच बांधले. श्रीमंत शिंदे
सरकारांच्या याच सेवेचे स्मरण म्हणून त्यांचे समाधीस्थळ असलेल्या शिंदे छत्री जवळ
सकाळची आरती होते. इ.स.१८३१ पासून ह्या
वारी सोहोल्यास श्रीमंत शितोळे सरकार यांचा राजाश्रय आहे. आजही तो अखंडपणे चालूच
आहे. त्यांच्या ह्या सेवेचे स्मरण आणि बूज म्हणून आजही श्री माऊलीचा रात्रीतळाचा
मुक्काम श्रीमंत शितोळे सरकारांच्या तंबूतच असतो.
वाखरी येथून
पंढरीस वारी जाताना श्री माऊलींच्या पादुका रथातून उतरून घेऊन श्रीमंत शितोळे
सरकार यांच्या गळ्यात दिल्या जातात. वारीतील दिडयामध्ये काही वाद निर्माण झाल्यास
तो वाद मालक, चोपदार, दिंडी प्रमुख, देवस्थान विश्वस्थ यांच्या सयुक्त
बैठकित, श्रीमंत शितोळे सरकार यांच्या ध्वजाखाली निर्णय घेऊन
सोडविण्यात येतो. संपूर्ण वारी सोहळ्यात
मानाच्या कीर्तनाव्यतिरिक्त इतर कुठलेही कीर्तन होत नाही. ह्या कीर्तन सेवा श्री
हैबतबाबांपासून चालत आलेल्या आहेत आणि आजही त्यांचे वंशज अतिशय श्रद्धेने त्या पार
पाडत आहेत. या रिंगण सोहळ्यानंतरचा ‘उडीचा कार्यक्रम’
हा खूपच सुंदर आणि अवर्णनीय असतो.
वारी
सोहळ्यातील सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ‘रिंगण’. त्याचे दोन प्रकार आहेत १) उभे, २) गोल. वारीसोहळ्यात तीन उभी आणि चार गोल रिंगणे होतात. त्यातील दोन
रस्त्याच्या उजव्या तर दोन रस्त्याच्या डाव्या बाजूला होतात. त्यांतही दोन रिंगणे
जेवणापूर्वी आणि दोन रिंगणे जेवणानंतर होतात. वारीत चालत असताना म्हणायच्या
अभंगांचा क्रम आणि नियम ठरलेला असतो. रूपाचे, भूपाळीचे,
वासुदेव, आंधळे, पांगळे,
गौळणी इत्यादी अभंग सकाळच्या वेळी, दुपार
जेवणानंतर हरिपाठ, गुरूपरंपरेचे अभंग, नाटाचे
अभंग वारकरी म्हणतात. ठराविक वारांचे अभंग त्या त्या दिवशी म्हटले जातात. सर्व
दिंड्या एकच अभंग एकदम म्हणत नाहीत. प्रत्येक दिंडीत मात्र एका वेळी एकच अभंग ऐकू
येतो. दुपारी जेवणानंतर ज्ञानोबारायांचा ‘हरिपाठ’ म्हटला जातो. हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामधील शेवटचे चरण ‘ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान | समाधी संजीवन
हरिपाठ॥ ‘म्हटले जाते त्यावेळी दिंडी थांबते; त्याबरोबर पालखीही थांबते आणि दिंडीतील लोक उभे राहून ते चरण म्हणतात.
तेथूनच भूमीला स्पर्श करून श्री माऊलीला वंदन करतात. वारीसाठीची पूर्वतयारी
संस्थान समिती, मालक, चोपदार हे चैत्र
महिन्यापासूनच सुरू करतात. वारीच्या मार्गातील सर्व तहसील, ग्रामपंचायतींना
भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करतात व योग्य उपाययोजना सुचवितात. वारीत लाखोंचा
जनसमुदाय एकत्रित चालतो पण त्यात कधीच कुठेही भांडणतंटा होत नाही. विशेष काही
तक्रार असल्यास रात्रीच्या मुक्कामासाठीच्या तळावर त्याबाबत निर्णय घेतला जातो. वारीतील
प्रत्येक दिंडी स्वत:चे सर्व साहित्य स्वत: आणते. दिंडीमध्ये चालणार्या प्रत्येक
वारकर्याची त्यात अंतर्गत भिशी (कॉन्ट्रिब्यूशन) असते. सर्व खर्च या निधीतून केले
जातात. काही दानशूर दिंडीला या ना त्या स्वरूपात दानही देतात. रथापुढील दिंड्या
माऊली चालायला लागली की चालणे सुरू करतात. माऊली विसाव्याला किंवा तळावर
थांबल्यावरच या दिंड्या विसावतात (बसतात). विसाव्याच्या जागी अगोदर पोहोचूनही जोवर
माऊली विसावत नाही तोवर या दिंड्याही विसावत नाहीत. काही वारकरी वारीत फक्त
पाणीवाटपाची सेवा देतात. वारी सुरू होऊन संपेपर्यंत त्यांचे काम पाणी वाटपाचेच
असते. काही वारकरी संपूर्ण वारीत अनवाणी चालतात, तर काही
वारीत एकच वेळ जेवण करून चालतात. वारी सोहळ्यातील काही दिंड्या ह्या लोकशाही
पद्धतीने चालविल्या जातात. श्री गुरू बाबासाहेब आजरेकर फड (रथामागे ७ क्रमांकाची
दिंडी) हे या पद्धतीचे उदाहरण. फक्त वारीपुरतेच नाही तर वर्षभर ह्या दिंड्यांचे
हरीभक्तीचे कार्यक्रम आपापल्या गावी सुरू असत……
हरिपाठ
-- १ --
देवाचिये
द्वारी उभा क्षणभरी ।
तेणे मुक्ती चारी साधियेल्या ॥ १ ॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥ २ ॥
असोनि संसारी जिव्हे वेगु करी ।
वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ॥ ३ ॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे ।
द्वारकेचा राणा पांडवा घरी ॥ ४ ॥
-- २ --
चहू वेदी जाण
साही(षट्)शास्त्री कारण ।
अठराही पुराणे हरिसी गाती ॥ १ ॥
मंथुनी नवनीता तैसे घे अनंता ।
वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥ २ ॥
एक हरि आत्मा जीवशिवसमा ।
वाया तू दुर्गमा न घाली मन ॥ ३ ॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ ।
भरला घनदाट हरि दिसे ॥ ४ ॥
-- ३ --
त्रिगुण असार
निर्गुण हे सार ।
सारासार विचार हरिपाठ ॥ १ ॥
सगुण निर्गुण गुणाचे अगुण ।
हरिविण मन व्यर्थ जाय ॥ २ ॥
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार ।
जेथुनि चराचर हरिसी भजे ॥ ३ ॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी ।
अनंत जन्मानी पुण्य होय ॥ ४ ॥
-- ४ --
भावेविण भक्ति
भक्तिविण मुक्ति ।
बळेविण शक्ति बोलू नये ॥ १ ॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरीत ।
उगा राहे निवांत शिणसी वाया ॥ २ ॥
सायासे करिसी प्रपंच दिननिशी ।
हरिसी न भजसी कोण्या गुणे ॥ ३ ॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे ।
तुटेल धरणे प्रपंचाचे ॥ ४ ॥
-- ५ --
योगयागविधी
येणे नोहे सिद्धी ।
वायाची उपाधी दंभ धर्म ॥ १ ॥
भावेविण देव न कळे नि:संदेह ।
गुरुविण अनुभव कैसा कळे ॥ २ ॥
तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त ।
गुजेविण हित कोण सांगे ॥ ३ ॥
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात ।
साधूचे संगती तरणोपाय ॥ ४ ॥
-- ६ --
साधुबोध झाला
नुरोनिया ठेला ।
ठायीच मुराला अनुभवे ॥ १ ॥
कापुराची वाती उजळली ज्योति ।
ठायीच समाप्ती झाली जैसी ॥ २ ॥
मोक्षरेखे आला भाग्ये विनटला ।
साधूंचा अंकिला हरिभक्त ॥ ३ ॥
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी ।
हरि दिसे जनी वनी आत्मतत्त्वी ॥ ४ ॥
-- ७ --
पर्वताप्रमाणे
पातक करणे ।
वज्रलेप होणे अभक्तांसी ॥ १ ॥
नाही ज्यासी भक्ति ते पतित अभक्त ।
हरिसी न भजत दैवहत ॥ २ ॥
अनंत वाचाळ बरळती बरळ ।
त्या कैसा दयाळ पावेल हरि ॥ ३ ॥
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान ।
सर्वाघटी पुर्ण एक नांदे ॥ ४ ॥
-- ८ --
संतांचे
संगती मनोमार्ग गती ।
आकळावा श्रीपती येणे पंथे ॥ १ ॥
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा ।
आत्मा जो शिवाचा रामजप ॥ २ ॥
एकतत्त्व नाम साधिती साधन ।
द्वैताचे बंधन न बाधिजे ॥ ३ ॥
नामामृत गोडी वैष्णवा लाधली ।
योगिया साधली जीवनकळा ॥ ४ ॥
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला ।
उद्धवा लाधला कृष्ण दाता ॥ ५ ॥
ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ ।
सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥ ६ ॥
-- ९ --
विष्णुविण जप
व्यर्थ त्याचे ज्ञान ।
रामकृष्णी मन नाही ज्याचे ॥ १ ॥
उपजोनि करंटा नेणे अद्वैत वाटा ।
रामकृष्णी पैठा कैसेनि होय ॥ २ ॥
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान ।
तया कैसे कीर्तन घडे नामी ॥ ३ ॥
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान ।
नामपाठे मौन प्रपंचाचे ॥ ४ ॥
-- १० --
त्रिवेणी
संगमी नाना तीर्थे भ्रमी ।
चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ॥ १ ॥
नामासी विन्मुख तो नर पापीया ।
हरिविण धावया न पावे कोणी ॥ २ ॥
पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मिक ।
नामे तिन्ही लोक उद्धरती ॥ ३ ॥
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचे ।
परंपरा त्याचे कुळ शुद्ध ॥ ४ ॥
-- ११ --
हरिउच्चारणी
अनंत पापराशी ।
जातील लयासी क्षणमात्रे ॥ १ ॥
तृण अग्निमेळे समरस झाले ।
तैसे नामे केले जपता हरि ॥ २ ॥
हरिउच्चारण मंत्र हा अगाध ।
पळे भूतबाधा भेणे याचे ॥ ३ ॥
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ ।
न करवे अर्थ उपनिषदा ॥ ४ ॥
-- १२ --
तीर्थ व्रत
नेम भावेविण सिद्धी ।
वायाची उपाधी करिसी जना ॥ १ ॥
भावबळे आकळे एरव्ही नाकळे ।
करतळी आवळे जैसा हरि ॥ २ ॥
पारियाचा रवा घेता भूमीवरी ।
यत्न परोपरी साधन तैसे ॥ ३ ॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण ।
दिधले संपूर्ण माझे हाती ॥ ४ ॥
-- १३ --
समाधी हरिची
समसुखेविण ।
न साधेल जाण द्वैतबुद्धी ॥ १ ॥
बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे ।
एका केशवराजे सकळ सिद्धी ॥ २ ॥
ऋद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी ।
जव त्या परमानंदी मन नाही ॥ ३ ॥
ज्ञानदेवी रम्य रमले समाधान ।
हरिचे चिंतन सर्वकाळ ॥ ४ ॥
-- १४ --
नित्य
सत्यामित हरिपाठ ज्यासी ।
कळिकाळी त्यासी न पाहे दृष्टी ॥ १ ॥
रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप ।
पापाचे कळप पळती पुढे ॥ २ ॥
हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा ।
म्हणती जे वाचा तया मोक्ष ॥ ३ ॥
ज्ञानदेवा पाठ नारायण नाम ।
पाविजे उत्तम निजस्थान ॥ ४ ॥
-- १५ --
एक नाम हरि
द्वैत नाम दुरी ।
अद्वैत कुसरी विरळा जाणे ॥ १ ॥
समबुद्धी घेता समान श्रीहरि ।
शमदमा वरी हरि झाला ॥ २ ॥
सर्वाघटी राम देहादेही एक ।
सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी ॥ ३ ॥
ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा ।
मागिलिया जन्मा मुक्त झालो ॥ ४ ॥
-- १६ --
हरिनाम जपे
तो नर दुर्लभ ।
वाचेसी सुलभ रामकृष्ण ॥ १ ॥
रामकृष्ण नामी उन्मनी साधिली ।
तयासी लाधली सकळ सिद्धी ॥ २ ॥
सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले ।
प्रपंची निवाले साधुसंगे ॥ ३ ॥
ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा ।
येणे दशदिशा आत्माराम ॥ ४ ॥
-- १७ --
हरिपाठ
कीर्ति मुखे जरी गाय ।
पवित्रचि होय देह त्याचा ॥ १ ॥
तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप ।
चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे ॥ २ ॥
मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार ।
चतुर्भुज नर होऊनी ठेले ॥ ३ ॥
ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवा लाधले ।
निवृत्तीने दिधले माझे हाती ॥ ४ ॥
-- १८ --
हरिवंश पुराण
हरिनाम संकीर्तन ।
हरिविण सौजन्य नेणे काही ॥ १ ॥
तया नरा लाधले वैकुंठ जोडले ।
सकळही घडले तीर्थाटन ॥ २ ॥
मनोमार्गे गेला तो तेथे मुकला ।
हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य ॥ ३ ॥
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी ।
रामकृष्णी आवडी सर्वकाळ ॥ ४ ॥
-- १९ --
नामसंकीर्तन
वैष्णवांची जोडी ।
पापे अनंत कोटी गेली त्यांची ॥ १ ॥
अनंत जन्मांचे तप एक नाम ।
सर्व मार्ग सुगम हरिपाठ ॥ २ ॥
योग याग क्रिया धर्माधर्म माया ।
गेले ते विलया हरिपाठी ॥ ३ ॥
ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म ।
हरिविण नेम नाही दुजा ॥ ४ ॥
-- २० --
वेद शास्त्र
पुराण श्रुतीचे वचन ।
एक नारायण सार जप ॥ १ ॥
जप तप कर्म हरिविण धर्म ।
वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ॥ २ ॥
हरिपाठी गेले ते निवांतचि ठेले ।
भ्रमर गुंतले सुमन कळिके ॥ ३ ॥
ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र ।
यमे कुळगोत्र वर्जियेले ॥ ४ ॥
-- २१ --
काळ वेळ नाम
उच्चारिता नाही ।
दोन्ही पक्ष पाही उद्धरती ॥ १ ॥
रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण ।
जडजीवा तारण हरि एक ॥ २ ॥
नाम हरि सार जिव्हा या नामाची ।
उपमा त्या दैवाची कोण वानी ॥ ३ ॥
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ ।
पुर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ॥ ४ ॥
-- २२ --
नित्यनेमनामी
ते प्राणी दुर्लभ ।
लक्ष्मीवल्लभ तया जवळी ॥ १ ॥
नारायण हरि नारायण हरि ।
भक्ति मुक्ति चारी घरी त्यांच्या ॥ २ ॥
हरिविण जन्म तो नर्कचि पै जाणा ।
यमाचा पाहुणा प्राणी होय ॥ ३ ॥
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड ।
गगनाहूनि वाड नाम आहे ॥ ४ ॥
-- २३ --
सात पाच तीन
दशकांचा मेळा ।
एकतत्त्वी कळा दावी हरि ॥ १ ॥
तैसे नव्हे नाम सर्व मार्गा वरिष्ठ ।
येथे काही कष्ट न लागती ॥ २ ॥
अजपा जपणे उलट प्राणाचा ।
तेथेही मनाचा निर्धारु असे ॥ ३ ॥
ज्ञानदेवा जिणे नामेविण व्यर्थ ।
रामकृष्णी पंथ क्रमीयेला ॥ ४ ॥
-- २४ --
जप तप कर्म
क्रिया नेम धर्म ।
सर्वाघटी राम भाव शुद्ध ॥ १ ॥
न सोडी हा भावो टाकी रे संदेहो ।
रामकृष्णी टाहो नित्य फोडी ॥ २ ॥
जात वित्त गोत कुळ शीळ मात ।
भजे का त्वरित भावनायुक्त ॥ ३ ॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी ।
वैकुंठ भुवनी घर केले ॥ ४ ॥
-- २५ --
जाणीव नेणीव
भगवंती नाही ।
हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा ॥ १ ॥
नारायण हरि उच्चार नामाचा ।
तेथे कळिकाळाचा रीघ नाही ॥ २ ॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ।
ते जीव जंतूसी केवि कळे ॥ ३ ॥
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ ।
सर्वत्र वैकुंठ केले असे ॥ ४ ॥
-- २६ --
एक तत्त्व
नाम दृढ धरी मना ।
हरिसी करुणा येईल तूझी ॥ १ ॥
ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद ।
वाचेसी सद्गद् जपे आधी ॥ २ ॥
नामापरते तत्त्व नाही रे अन्यथा ।
वाया आणिका पंथा जाशी झणी ॥ ३ ॥
ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी ।
धरोनी श्रीहरि जपे सदा ॥ ४ ॥
-- २७ --
सर्व सुख
गोडी सर्व शास्त्रे निवडी ।
रिकामा अर्धघडी राहू नको ॥ १ ॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार ।
वाया येरझार हरिविण ॥ २ ॥
नाममंत्र जप कोटी जाईल पाप ।
रामकृष्णी संकल्प धरूनी राहे ॥ ३ ॥
निजवृत्ति काढी सर्व माया तोडी ।
इंद्रियांसवडी लपू नको ॥ ४ ॥
तीर्थ व्रती भाव धरी रे करुणा ।
शांति दया पाहुणा हरि करी ॥ ५ ॥
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान ।
समाधि संजीवन हरिपाठ ॥ ६ ॥
२८
अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस । रचिले विश्वासें
ज्ञानदेवें ॥ १॥
नित्य पाठ करी इंद्रायणीतीरीं । होय अधिकारी
सर्वथा तो ॥ २॥
असावें एकाग्रीं स्वस्थ चित्त मन । उल्हासें
करून स्मरण जीवी ॥ ३॥
अंतकाळीं तैसा संकटाचें वेळीं । हरि तया सांभाळी
अंतर्बाह्य ॥ ४॥
संतसज्जनानीं घेतली प्रचीती । आळशी मंदमती केवीं
तरें ॥ ५॥
श्रीगुरु निवृत्ति वचन प्रेमळ । तोषला तात्काळ
ज्ञानदेव ॥ ६॥
२९
कोणाचें हें घर हा देह कोणाचा । आत्माराम त्याचा
तोचि जाणे ॥ १॥
मी तूं हा विचार विवेक शोधावा । गोविंदा माधवा
याच देहीं ॥ २॥
देहीं ध्याता ध्यान त्रिपुटीवेगळा । सहस्र दळीं
उगवला सूर्य जैसा ॥ ३॥
ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती । या नावें रूपें
तुम्ही जाणा ॥ ४॥
श्री ज्ञानेश्वर महाराज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा