महाशिवरात्र खास असण्याची ही कारणे?
- यंदाची महाशिवरात्र सोमवार दिनांक ७ मार्चला दुपारी १.२० वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३३ मिनिटांपर्यंत असेल.
- यंदाची महाशिवरात्र विशेष असेल कारण यंदा भगवान शंकरांच्या सोमवारी त्रयोदशी आणि चतुर्दशी अशा दोन्ही तिथी येणार आहेत.
- याच दिवशी शुभ योग तसेच पंचग्रह, ग्रहण तसेच कालसर्प योगही येणार असल्याने ग्रहशांतीचा लाभही मिळणार आहे.
- भगवान शंकर हे तंत्राचे महादेव आहेत. म्हणून तंत्राच्या चार रात्रींपैकी एक रात्र महाशिवरात्र म्हणून साजरी केली जाते. यंदा मार्च महिन्यात ही रात्र महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाणार आहे.
- तंत्रांमध्ये अशा अनेक साधना असतात ज्या केवळ रात्रीच्या वेळेसच केल्या जातात. ही साधना करणे हे इतर अनेक साधना करण्यापेक्षा कित्येक पटीने लाभदायी आणि फलदायी असते.
- याच दिवशी शिवज्योती प्रकट झाली होती आणि शिव पार्वती यांचा विवाहसुद्धा झाला होता.
असा योग फलदायी!
सोमवारी येणाऱ्या महाशिवरात्रीचा योग फलदायी असतो. याचे कारण चंद्र, राहू आणि केतू हे ज्यांच्यासाठी वाईट स्थानात आहेत त्यांच्यासाठी भगवान शंकरांची आराधना फलदायी असणार आहे.
भगवान शंकरांविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते. उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाहीत ना, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. खाली दिलेल्या या गोष्टी भगवान शंकरांना कधीही देऊ नका.
१. शंख - शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या असूराचा वध केला होता. तो भगवान विष्णूचा भक्त असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते.
२. हळद - भगवान शंकर आजन्म वैरागी होते. त्यामुळे शृंगाराशी संबंधी कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही. हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते. त्यामुळेच हळद किंवा केशरही भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही. या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात.
३. तुळशी पत्र - असूरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती. भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता. त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता.
४. नारळ पाणी - नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरांवर अभिषेक केला जात नाही. नारळाला लक्ष्मीचे रुप मानले जाते. म्हणून शुभकार्यात नारळाचा वापर करुन त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो. पण, भगवा शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते.
५. उकळलेले दूध - उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये. त्यापेक्षा गंगाजलाने अभिषेक करा. बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूधही उकळलेले असते. त्यामुळेच त्याचा वापर करणेही टाळावे.
६. केवड्याचे फूल - भगवान शिवांच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे. शिव पुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता.
७. कुंकू किेंवा शेंदूर - कुंकू किंवा शेंदूराचा वापरही भगवान शंकरांची पूजा करण्यात वर्ज्य केला आहे.


