शुक्रवार, २० मार्च, २०१५

किल्ले अवचितगड मोहीम !

" किल्ले अवचितगड मोहीम "


किल्ले रायगड , किल्ले राजमाची , किल्ले विसापूर, किल्ले श्री वर्धन , किल्ले लोहगड, किल्ले रसाळ गड मोहिमा तिच्या ध्येयाबरोबर यशस्वीपणे पूर्ण करताना यंदा प्रथमच शंभू महादेवाच्या कृपेने “महाशिवरात्री” (सन २०१५) निमित्त #मोहीम #क्रमांक – ६ थेट #किल्ले #अवचितगड येथे राबवण्याचा निर्णय झाला. माझी माणसं अंतर्गत हा आमचा #किल्ला#क्रमांक - ७ ठरला . यासाठी ठरल्याप्रमाणे आम्ही दिनांक १६/२/२०१५ रात्री ठीक ८ वाजता दिवा स्थानक येथून दिवा-रोहा गाडी ने प्रवास सुरु करणार होतो. त्यासाठी मुंबईवरून श्री दिनेश सावंत, श्री विनोद भोसले, श्री प्रशांत मोरे, श्री बाळासाहेब त्र्यबके, श्री दीपक जाधव, श्री अभिजित भोसले, दिवा येथून नवीन शिलेदार श्री निलेश जावळेकर तसेच पुढे डोबिवली वरून आमच्या परिवाराचे सरसेनापती व जेष्ठ सदस्य माननीय श्री अचलभाऊ राणे, आणि शेवटी बदलापूरहून मी योगेश वाळूंज असे सर्व ९ जण जमणार होतो. ठरल्याप्रमाणे अचल राणे ,प्रशांत , बाळासाहेब ,अभिजित, आणि निलेश ठरलेल्या वेळेप्रमाणे दिवा स्टेशन परिसरात वेळेवर दाखल झाले, परंतु व्यस्तकामांमुळे विनोद भोसले , दिनेश सावंत, दीपक जाधव, आणि मी. आम्ही ठरलेल्या वेळी पोचण्यात अयशस्वी ठरलो. आमची एक टीम जी वेळेवर उपस्थित होती ती पुढे दिवा-रोहा प्यासेंजर ट्रेनने रवाना झाली. पाठीमागे राहिलेलो आम्ही ४ जणांनी मग दुसऱ्या प्यासेंजर ट्रेन ची चातकासारखी वाट पाहत ठाणे स्थानक गाठले. परंतु त्या दिवशीची ती शेवटची ट्रेन होती जी आम्ही मिस केली होती. काय करावे आणि काय नाही याचा विचार सुरु झाला. पुढे गेलेल्या आमच्या सहकार्यांचे फोन सुरु झाले. त्यांना आश्वस्त करून आम्ही दुसऱ्या साधनांचा शोध घेऊ लागलो. तेव्हा पनवेल ला जाऊन तेथून बाय रोड ने जाऊ शकू असा विचार पुढे आला. त्यावर अधिक वेळ न दवडता आम्ही थेट ठाणे-पनवेल ट्रेन पकडली आणि पनवेल स्टेशन गाठले, तेथून कोलाड-रोहा-मेढा असा प्रवास करायचा होता मग आम्ही पनवेल बस स्थानकात पोहचत असताना एका पेस्सेंजर ओम्नी चालकाने कोलाड येथपर्यंत सोडू असा सांगितले. त्याच्याशी स्पष्ट व्यावहारिक बोलणी (तिकीट दर) करून प्रवास सुरु केला. कोलाड ला पोहचल्यावर पुढे ७ किमी दूर असलेल्या मेढा गाव येथे जाण्यासाठी आम्हाला खिशाला परवडणारे असे योग्य साधन मिळत नव्हते. रात्रीच्या वेळेच्या आणि आमच्या नाईलाजपनाचा फायदा इतरांना हि हवा होता. वेळ निघून चालला होता. आमची पहिली टीम गावातील एका मंदिराच्या बाहेर थंडीत आपुलकीने आमची वाट पाहत थांबली होती. आमच्या हि मनाला टाचणी लागत होती कि, या सर्वांस आम्हीच जबाबदार होतो. शेवटी कोलाड वरून रिक्षा पकडून आम्ही मेढा गाव गाठले. पण जसे आम्ही गावात पोहचलो आमच्या पहिल्या टीम शी असणारा मोबाईल संपर्क तुटला. सुमारे तासभर आम्ही रिक्षाचालक काका बरोबर आमच्या टीम चा शोध घेऊ लागलो. गावातील सर्व मंदिरे पाहून झाली पण आमचे सहकारी काही केल्या सापडत नव्हते. बराच वेळानंतर रिक्षा हि निघून गेली. आम्ही रात्रीच्या अंधारात त्या गावात असलेल्या आणि संपर्क न होऊ शकणार्या आमच्या टीम चा पुन्हा शोध घेऊ लागलो. शोधता शोधता आम्हाला एका मार्गावरील मंदिराबाहेर आराम करत असलेली आमची टीम नजरेस आली . आणि नकळत स्मितहास्य आमच्या सर्वांच्याच ओठावर फुलले. सर्वांशी आपुलकीने भेटून मनातून खजील झालेलो आम्ही पुन्हा ध्येयांनी एक झालो ! तेथून “हर हर महादेव” आणि “छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या” निरंतर जयघोषाने सुरु झाला आमचा एकत्रितपणे किल्ले अवचितगड मोहिमेचा एक अविस्मरणीय असा प्रवास ! – हर हर महादेव !! जय जय शिवराय !!
अवचितगड, हा सुरगड, पालीचा किल्ला व भोराईचा किल्ला यांच्याबरोबरच कर्नल प्रॉथरच्या सैन्यानें १८१८ फेब्रुवारींत जिंकून घेतला. हा किल्ला मूळ शिवाजीनें शेख महमंद नावाच्या कारागिराकडून बांधविला होता असें म्हणतात. [संदर्भ ग्रंथ— कुलाबा गॅझियटर]
सह्याद्रीतल्या अवशेषांनी युक्त आणि निसर्गाने परिपूर्ण अशा किल्ल्यांची यादी काढली तर त्यात रायगड जिल्ह्यातल्या अवचितगडाचा क्रमांक अग्रणी असेल. रायगड जिल्ह्यातील रोहा या तालुक्याच्या शहरापासून फक्त सात किलोमीटर्स अंतरावर असणारा अवचितगड हा अवशेषांनी समृद्ध आणि सर्वागसुंदर गिरिदुर्ग वर्षभरात कधीही भेट देण्यासारखा आहे. साक्षात रायगड भोवतालच्या परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी ह्या किल्ल्यावर होती. तिथे प्रचंड महसूल ठेवला जात असे. राजधानी जवळ असल्याने ही व्यवस्था केली होती. त्यामुळे महाराजांच्या श्रीमंत किल्ल्यांमध्ये अवचितगडाचेसुद्धा नाव घ्यावे लागेल. गडाचे असलेले स्थान हे त्याच्या जमेची बाजू आहे. गर्द रानात एका उंच डोंगरावर हा किल्ला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवणे सहज सोप्पे जाते.मंदिरासमोरून एक छोटं रेल्वेचे फाटक ओलांडून पुढे निघालो की थोड्या अंतरावर एक भलीमोठी विहीर आहे आणि तिथून उजव्या बाजूने जंगलातून वाट आहे. अवचितगड भग्नावस्थेत आहे. निरनिराळ्या वास्तू ढासळत आहेत. गडावर दरवर्षी काही गोष्टी नेमाने होतात.गडावर असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी काही भाविक मंडळी महाशिवरात्रीच्या दिवशी येतात. गडावर येणार्‍यांची विशेष वर्दळ असते. 
ऐतिहासिक वास्तूंचे जतन आपणच करायचे असते हे लोकांच्या मनात उतरवण्याचे कार्य गेली काही वर्षे रोह्यातील दुर्गप्रेमी करत आहेत.किल्ल्यांचे रक्षणाचे कार्य किती महत्त्वाचे आहे हे सर्वानीच समजले पाहिजे.

ध्येय - मोहीम जबाबदारीने यशस्वीपणे संपन्न करणे , गडावरील ध्वज चांगल्या स्थितीत नसेल तर ध्वज बदलणे, गडभ्रमण आणि इतिहास संदर्भात माहिती घेणे व अवलोकन करणे, शिवलीलामृत पारायण ( अध्याय १), आणि भजन , विचार-देवाण घेवाण, चर्चा . आदी उद्धिष्ट सफल संपूर्ण, मोहीम फत्ते !!



"किल्ले अवचितगड मोहीम" - फोटो संग्रह साठी येथे या !