संकट हरण्या
दूर करण्या
आदिलशाहीच्या अंधाराला
शिवनेरीवर सूर्य उगवला
[घेतली] बालसवंगडी जमवुनी सारे शपथ स्वराज्याची
एकमुखाने गाऊ चला रे कीर्ती शिवबाची
संगे मावळ्या
वयी कोवळ्या
प्रचंडगडावर केली स्वारी
विजयाची दुमदुमली तुतारी
साक्ष देई या इतिहासाची ती बुधला माची
एकमुखाने गाऊ चला रे कीर्ती शिवबाची
होऊनि मदमस्त
करि उध्वस्त
घरे मंदिरे अन् अभिमान
चालून आला अफझलखान
बलदंड खानावर भारी पडली युक्ती राजांची
एकमुखाने गाऊ चला रे कीर्ती शिवबाची
स्वराज्य श्रींचे
स्वरक्ताचे
वाचवण्या हा किल्ले पुरंदर
लढले-पडले वीर धुरंधर
हत्ती नि तोफांशी लढली भाला नि बरची
एकमुखाने गाऊ चला रे कीर्ती शिवबाची
देवू न कोणा
हा कोण्डाना
जिद्दीने या पेटून उठला
टक्कर देण्या उदेभानला
पराक्रमाची शर्थ करुनी लढला तानाजी
एकमुखाने गाऊ चला रे कीर्ती शिवबाची
आई जिजाऊ
अन् तुळजाऊ
वात्सल्याचा स्रोत महान
शिवरायांचे स्फूर्तीस्थान
सहिष्णुता, स्वाभिमान समता शिकवण ही उंची
शिवबासंगे गाऊ चला रे कीर्ती जिजाऊंची …. कीर्ती जिजाऊंची !
छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्वनी स्वरूपातील (“राजा शिवछत्रपती” लेखक –श्री बाबासाहेब पुरंदरे , पारायण – गीता उपासनी , भाग -२२,२३,२४,२५,२६,२७,२८,२९) चरित्र पारायण बदलापूर येथे सुफळ संपन्न झाले. त्यांनतर अर्थातच श्रावण महिना असल्याने आणि सोबत जिवाभावाची मित्र मंडळी असली कि बेत हि पटकन ठरतात . तसा पहिला तर अंबरनाथ येथील प्राचीन “शिव मंदिर” याची “देही याची डोळा” पाहण्याचे भरपूर दिवसापासून सर्वांच्याच मनात होते . आज “श्री शिव चरित्र” पारायणामुळे व्यस्त जीवनातून ती दुर्मिळ संधी साधता आली . बदलापूर रेल्वे स्थानकात्तून आम्ही त्या पुढील अंबरनाथ स्थानक गाठले . तेथून रिक्षा करून आम्ही अतिप्राचीन अश्या सांस्कृतिक वारसा असलेल्या दैदीप्यमान शिल्पवैभवाच्या साक्षात दर्शनाला “शिव मंदिराच्या” परिसरात दाखल झालो. ज्यांनी येथे येऊन खास हे आरसपानी सौंदर्य बघितले असतील ते नक्कीच हरखुन गेले असणार. खडकात भव्य प्राकार खोदून त्याच्यामध्ये हे मंदिर उभारले आहे. मला तर लांबुन पाहिले असता जगन्नाथाच्या डौलदार रथ उभा असल्यासारखे वाटले. तेथे असलेल्या छोट्या पुलावरून प्रांगणात आल्यावर मंदिरावर केलेले शिल्पकांम पाहुन थक्क व्हायला होते. पायापासुन शिखरापर्यंत हे मंदिर अगदी नखशिखांत आरसपानी सौंदर्याने नटलेले आहे. प्रवेशद्वारातुन आत जाताना दोन नंदी दिसतात. मंदिराचा गाभारा एखाद्या खोल विहिरीसारखा असुन खाली उतरायला पायर्याे आहेत. गाभार्याात शिरताच कमालीचा थंडावा जाणवतो. गाभार्यारत दोन शिवलिंग आहेत (कदाचित यामुळेच प्रवेशद्वारावर दोन नंदी असावेत). तेथे उभे राहुन वर पाहिले असता शिखराच्या बोगद्यातुन निळ्या आकाशाचे दर्शन होते. शिखराला जाळी लावलेली आहे. विविध पौराणिक कथा, नृत्यात मग्न असलेली शिल्पे, हातात आयुधे घेतलेली शिल्पं, विविध देवी-देवतांची शिल्पं याच्या चेहर्याकवरील भाव ठळकपणे दिसुन येतात.मंदिराच्या बाहेरून तुम्ही फोटो काढु शकता पण आतल्या बाजुने फोटो काढण्यास मनाई आहे.....
शिवमंदिराचा इतिहास -
हाजीमलंग डोंगराच्या पायथ्याशी उगम पावणा-या ‘वालधुनी’ नदीने उल्हासनगर व अंबरनाथ शहरांना विभागले आह़े याच नदीच्या तीरावर प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या अंबरनाथच्या शिवमंदिराचा ९५५ वा वर्धापन दिन सोमवारी साजरा करण्यात आला. शिलाहार राजघराण्याच्या काळात श्रावण शुद्ध नवमीला या शिवमंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. त्यामुळे हा दिवस या मंदिराचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. कोकण प्रांतात आढळणा-या काळ्या दगडांत ते कोरण्यात आले आह़े या मंदिराच्या बाह्य व आंतरभागांवर देवादिकांच्या मूर्ती कोरण्यात आल्यामुळे मंदिर आकर्षक वाटत़े या शिवमंदिरातील गाभा-यांत स्वयंभू शिवलिंग आह़े या गाभा-यांत जाण्यासाठी २० पाय-या खाली उतरावे लागत़े. या शिवलिंगाला ‘अंबरेश्वर’ म्हणूनही ओळखले जात़े याच मंदिराच्या नावावरून शहराला अंबरनाथ हे नाव पडले आह़े या मंदिराच्या परिसरात महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरत़े महाशिवरात्रीच्या काळात दर्शनासाठी भल्या मोठय़ा रांगा लागतात़ ठाणे, रायगड, पुणे भागातून लाखो भाविक स्वयंभू शिवपिंडीच्या दर्शनासाठी गर्दी करतात़ ही जत्रा तीन दिवस चालत़े.
अख्यायिका -
पांडवांनी एक मोठा दगड कोरून एका रात्रीत हे मंदिर बांधले असल्याची अख्यायिका आहे. या मंदिर परिसरातील एका गुंफेतून मंदिर बांधून पूर्ण झाल्यावर पांडव या ठिकाणाहून निघून गेले.हे मंदिर सर्वांत जुनं व ऐतिहासिक मंदिर म्हणून ओळखल जात. अंबरनाथचे शिवमंदीर हे संपूर्ण भारतवर्षातील पहिले भूमिज मंदीर जे अत्यंत कलात्मक आहे. शिल्पवैभवाची साक्ष देत वर्षानुवर्षे उन-पाऊस आणि काळाचा आघात सहन करत असलेले स्थापत्यशास्त्राचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे "अंबरनाथचे शिवमंदिर".


